सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार ? खाद्यतेल 10 रुपयांनी स्वस्त होणार!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ मे । येत्या काही दिवसांत किचनच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खाद्यतेलाच्या किमतीत 6 टक्क्यांनी घसरण होऊ शकते. खाद्यतेल कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनंतर खाद्य तेलाच्या किमती 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर खाद्यतेलाच्या किमतीत बदल करण्याची गरज आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. फॉर्च्यून ब्रँडचे मालक अदानी विल्मार व जेमिनी ब्रँडचे मालक जेमिनी एडिबल आणि फॅट्स इंडिया यांनी अनुक्रमे 5 रुपये प्रति लिटर आणि 10 रुपये प्रति लिटरने किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

किमतीतील कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत तीन आठवड्यात पोहोचेल, असे त्यांनी म्हटले आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (SEA) मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “खाद्य आणि ग्राहक व्यवहार विभागाने एसईएला त्यांच्या सदस्यांना खाद्यतेलांवरील MRP कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना लाभ देण्यासाठी सूचित करण्याचा सल्ला दिला आहे.”

उत्पादन वाढूनही भाव कमी झाले नाहीत
एसईएने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत विशेषत: गेल्या 60 दिवसांत आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये कच्च्या पामतेलाच्या किमतीत घट झाली आहे. भुईमूग, सोयाबीन आणि मोहरीचे बंपर उत्पादन होऊनही स्थानिक किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने घसरण झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सरकारला खाद्यतेल कंपन्यांना अशा सूचना द्याव्या लागल्या आहेत.

दरम्यान, ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात 2 मे रोजी शेंगदाणा तेलाचा दर 189.95 रुपये प्रति लिटर, मोहरीचे तेल 151.26 रुपये प्रति लिटर, सोया तेल 137.38 रुपये, सूर्यफूल तेल 145.12 रुपये प्रति लिटर आहे. यामध्ये पुढील तीन आठवड्यांत घट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *