राज्य मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ चेहऱ्यांना मिळू शकते संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । राज्य मंत्रिमंडळाचा गेली नऊ महिने रखडलेला विस्तार आता लवकरच होणार असून, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या महाराष्ट्र दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. मे महिनाअखेरीसच हा विस्तार करून शिंदे-फडणवीस सरकार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत.

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे बोलले जात असताना, भाजपने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना यश आले तर मंत्रिमंडळात काही जागा येणार्‍यांसाठी असाव्यात म्हणूनही त्या रिक्त ठेवल्याची चर्चा भाजपमध्ये होती. मात्र, आता भाजप-शिवसेना आपल्या जागा भरणार आहे. मेअखेरीस हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

‘या’ चेहर्‍यांना संधी?
भाजपमधून माजी मंत्री संजय कुटे, जयकुमार रावल, पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, राणा जगजितसिंह पाटील, रणधीर सावरकर, नितेश राणे, प्रशांत ठाकूर, योगेश सागर अशा चेहर्‍यांना संधी मिळू शकते.

शिंदे गटातून संजय शिरसाट, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नावे चर्चेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *