महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । अमेरिकेतील एका संशोधकाने पाण्याखाली 74 दिवस राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. या माणसाचे नाव आहे डॉ. जोसेफ डिटुरी. अर्थात, आपला प्रयोग अद्याप पूर्ण न झाल्याने या माणसाने पाण्याखालील आपले वास्तव्य सुरूच ठेवलेले आहे. फ्लोरिडाच्या की लार्गो येथे समुद्राच्या तळाशी तो हा शंभर दिवसांचा प्रयोग करीत आहे.
डिटुरी हे सोशल मीडियात आपल्या पाण्याखालील साहसाचे अनेक व्हिडीओही शेअर करीत असतात. आता हा विश्वविक्रम केल्यानंतर त्यांनी पाण्याखाली राहण्याचा आपला अनुभव व पुढील योजना सांगितल्या आहेत. पाण्याच्या पृष्ठभागाखाली ते कसे राहत आहेत, याची माहिती या क्लिपमधून मिळते.
73 व्या दिवशी त्यांनी आपण पाण्याखाली राहण्याचा जुना विक्रम आज मोडत आहोत, असे म्हटले होते. हा प्रयोग केवळ विक्रमासाठी नसून पाण्याखालचे जीवन कसे असते हे पाहण्यासाठी तसेच मनुष्याचे शरीर अशा स्थितीत कसे कार्य करते हे तपासण्यासाठीही आहे, असे त्याने म्हटले आहे. एकूण शंभर दिवस पाण्याखाली राहण्याचा हा प्रयोग आहे. ते की लार्गो येथील तीस फूट खोल लगूनच्या तळाशी राहत आहेत.