महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मे । शाळा तसेच महाविद्यालयांना सध्या सुरू असलेल्या सुट्ट्या आणि या सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत बाहेर पडणार्या पर्यटकांकडून, विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महानगरांसह गुजरातमधून येणार्या हौशी पर्यटकांची पसंती म्हणून लोणावळा खंडाळा शहराकडे बघितले जाते. त्यामुळे सध्या याठिकाणी येणार्या पर्यटकांची मोठी संख्या बघायला मिळत आहे. असीम निसर्गसौंदर्याने नटलेले, समुद्रसपाटीपासून 625 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर वसलेले लोणावळा शहर हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी असलेली विपूल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या आणि पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही मनाला खूप खूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते आणि त्यातही पावसाळ्यात देशी-विदेशी पर्यटकांची याठिकाणी अक्षरशः जत्रा भरते. सध्याच्या रणरणत्या उन्हात हैराण झालेले नागरिक थोडा बदल म्हणून लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी जास्त पसंती देतात.
मात्र, यात लोणावळा शहर हे प्रवासाच्या द़ृष्टीने जास्त सोयीचे असल्याने एक किंवा दोन दिवसांच्या सहलीसाठी पर्यटकांचा कल लोणावळा, खंडाळा शहरांकडे जास्त राहतो. लोणावळ्यात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची पहिली पसंती राहते ती भुशी धरणाला. हे धरण पावसाळ्यात पूर्ण भरल्यावर या धरणाच्या भिंतीला असलेल्या पायर्यांवरून फेसाळत वाहणार्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी प्रत्येक वीकेंडला एकाच वेळी हजारो, लाखो पर्यटक उपस्थिती लावत असतात आणि यावेळी या पर्यटकांमध्ये संचारलेला उत्साह हा केवळ पाहण्यासारखा असतो.