महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । उत्तर हिंदुस्थानात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानात आणखी आठवडाभर पावसाची शक्यता असल्याने दिल्ली पाण्यात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. दिल्लीत अतिवृष्टीने गेल्या 41 वर्षातील विक्रम मोडीत काढला आहे. तसेच युमनेच्या पुराने 45 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. दिल्लीत गेल्या 45 वर्षात असा पूर आला नव्हता, असे सांगण्यात येत आहे.
यमुनेने धोक्याची पातळी ओलांडल्याने दिल्लीची परिस्थिती अधिक बिकट होत आहे. पूरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. यमुनेने धोक्याची पातळी ओलांडल्याने धोका अधिक वाढला आहे. यमुनेची धोक्याची पातळी 205.37 मीटरवर असून सध्या यमुना 208.57 मीटरवर आहे. यमुनेच्या पूराचे पाणी लाल किल्ल्यापर्यंत आले असून ते आता आईटीओपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिल्लीतील अनेक रस्त्यांना नदीचे रुप आले आहे.
लाल किल्ला परिसराला पाण्याने वेढले आहे. जुन्या दिल्लीतील रेल्वे स्थानकापर्यंत जाणार रस्ता जलमय झाला आहे. हरियाणातील हाथिनीकुंड बैराज येथून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे यमुनेचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिल्लीतील लाल किल्ला, सोनिया विहार, शास्त्री पार्क,मॉडल टाऊन, निगमबोध घाट परिसरापर्यंत यमुनेचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे दिल्लीचा धोका वाढत आहे. दिल्लीतील पूरपरिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवत आहे. बचावकार्यासाठी पोलीस, एनडीआरएफ,एसडीआरएफ तैनात आहेत. पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहेत.